प्रति – ठॉ गँग

शाळेतले दिवस. त्या दिवसांत मला कोणी ‘प्रतिक’ ह्या नावाखेरीज आणखी कोणत्या नावाने हाक मारल्याचे आठवत नाही. बरं माझ्या आजूबाजूला दिसणाऱ्या मुलांमध्ये एक कमालीची गोष्ट मला जाणवायची आणि ती म्हणजे त्यांची एकमेकांना हाक मारण्याची पद्धत. त्यात गणेशचा ‘गण्या’ व्हायचा आणि राकेशचा ‘राक्या’. माझ्या नावासोबत मात्र असे कधीच झाले नाही आणि ज्याचा मला भलताच अभिमान होता. मला वाटायचं कि, नावं मोडण्यासारखी असली कि ती आपोआप मोडली जातात आणि माझं नाव मोडणं त्या मानाने थोडं जडच होतं. प्रतिकला ‘प्रतिक’ नाही म्हणणार तर आणखी काय म्हणणार? तरीही मनात कुठेतरी वाटायचं कि ह्या नावांच्या आड काही तरी गुपित नक्कीच दडलं असणार. हळू हळू नंतर वाटायला लागलं कि सगळ्यांना ह्या टोपण नावाची भेट मिळालेलीच असते. मी मात्र अपवादच. बरं मैत्री म्हणाल तर ती पण बऱ्यापैकी चांगलीच होती, तरीही मनात कुठेतरी वाटायचं कि माझं नाव कोण मोडणार आणि मला टोपण नाव कधी मिळणार. दिवस सरले, वर्ष उलटली मात्र तसे काही घडले नाही. अभिमानाची जागा आता अहंकाराने घेतली. प्रतिकला ‘प्रतिक’ च म्हणावं असा आग्रह मनात असायचा. प्रतिक ह्या नावाखेरीज दुसऱ्या कोणत्याच नावाची हाक कानावर यायची नाही आणि पुढे तर तशी सवयच झाली.

शाळा संपली. ज्युनिअर कॉलेजही उरकले. आता प्रवास सुरु झाला तो पदवीच्या वर्षांचा. पहिले सहा महिने फार जड गेलेत. मुळात माझा स्वभाव थोडा शिष्ट आणि वागणं  संकोचित ह्यामुळे मुलांशी मैत्री व्हायला वेळ लागला. जसे जसे दिवस सरले तशी मैत्री पण वाढायला लागली. पदवीची तीन वर्ष संपे पर्यंत काही मित्रांशी मैत्रीचं घट्ट नातं तयार झालं. नशिबाने साथ दिली आणि तीच मित्र मंडळी पदव्युत्तर वर्षात सोबत मिळाली. त्या दोन वर्षात मी जे प्रसंग अनुभवले ते अविस्मरणीय आहेत. आमच्या मैत्रीला आणखी एक सुंदर वळण मिळालं आणि ते म्हणजे आम्ही अस्तित्वात आणलेला आमचा ग्रुप “ठॉ गँग”. आणि “ठॉ गँग” म्हंटली कि डोळ्यासमोर येतात ते माझे “ठॉवर्स मित्र”.

ठॉवर्समुळे प्रतिकचा अखेरीस ‘प्रत्या’ झाला. त्यांना मला “प्रत्या” म्हणून बोलताना विचित्र वाटत नसेल का असा मनात विचार यायचा. पण नंतर कळलं कि त्यांना ते बोलण्यात नाही तर मला ते ऐकण्यात विचित्र वाटत होतं कारण मला तशी सवयच नव्हती. पण आता मात्र माझी फार पूर्वीची मनातली एक इच्छा पूर्ण झाली होती. मित्रांनी प्रेमाने आपल्या वर दाखवलेला हक्क मी आता अनुभवत होतो, त्यामुळे कोणी “प्रत्या” असे म्हंटले कि अगदी छान वाटायचं आणि ते मला आजही वाटतं. माझ्या आयुष्यात सगळ्यात सुंदर घडलेल्या गोष्टींपैकी एक म्हणजे मला मिळालेली ही मित्रमंडळी. माझ्या नावारुपात, राहण्या-साहण्यात, वावरण्यात आणि विचार करण्यात जे काही बदल झालेत त्यात सगळ्यात मोठा वाटा ह्याच मित्रांचा. त्यांची ओळख होण्याआधीचं माझं आयुष्य आणि त्यांच्यांशी ओळख झाल्यानंतरचं आयुष्य यात जमीन आसमानचा फरक आहे. थोडक्यात त्यांची ओळख झाल्याने मला जगाची ओळख झाली असे म्हणायला हरकत नाही.

म्हणतात व्यक्तीवर त्याच्या संगतीचा खूप प्रभाव असतो. माझ्यावरही तो आहे. टप्प्या टप्प्यावर मी माझ्या मित्रांकडून काही ना काही शिकत गेलो. मैत्री म्हणजे काय आणि ती कशी जगायची हे त्यांच्या कडूनच शिकलो. रुपया रुपयाचा हिशोब ठेवणारा मी आता नात्यातून व्यवहार बाजूला ठेवायला शिकलो. मैत्री टिकवायला जागा, वेळ किंबहुना एक सारख्या विचारांची अथवा स्वभावाची गरज नसते तर गरज असते ती फक्त प्रेमाची हे पण मी माझ्या ह्याच मित्रांकडून शिकलो. गरजेच्या वेळी पुरून उरतील अशी ही मित्र मंडळी. यांच्यातला प्रत्येकजण मला काही ना काही शिकवून गेलाय.

वेगवेगळ्या स्वभावाची, विचारांची चार माणसं जोडून कशी ठेवायची आणि त्यांच्यात बांधिलकी कशी टिकवायची हे राहुल्या सहजपणे शिकवून जातो. मन मोठे असणे म्हणजे काय किंवा मदत करण्याची भावना नेमकी काय असते हे अम्यापेक्षा चांगले कोणाला माहित नसावे. स्वच्छंद आयुष्य जगण्याचे धडे बरव्याकडून घ्यावे असे नेहमीच वाटते. कुठल्याच बाबतीत कधीच कमी न होणारा त्याचा उत्साह कमालीचा वाटतो. जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर सगळे काही मिळवता येते हे सुन्या कडे पाहून कळते आणि एखाद्या गोष्टीत सातत्य कसे टिकवायचे हे विशल्या दर्शवून देतो. विविध गोष्टीतलं  ज्ञान आयुष्यात किती महत्वाचं असतं हे दऱ्या सोबत राहिल्या वर कळते आणि स्वभावात पारदर्शकता, स्पष्टपणा असल्यावर गोष्टी किती सरल वाटतात हेही दऱ्यामुळे अनुभवायला मिळतं. सकारात्मक विचार आणि दृशिकोन कसा अंगीकारावा हे मोहन्याकडे बघितल्यावर कळते. आणि सगळ्यात शेवटी आयुष्य अगदी हसत खेळत, कसलीही चिंता न करता कसं जगावं हे घन्याकडे पाहून समजतं. तुमच्या कडून घेण्यासारखे खूप काही आहे आणि मी थोडं थोडं ते घेत आज इथ पर्यंत आलोय आणि पुढे ही मी ते घेत राहणार.

ठॉवर्सची सोबत ही अशीच यापुढेही राहील आणि मला काही ना काही शिकायला मिळत राहील याची खात्री आहे. आपला हा आयुष्यातला प्रवास असाच मजा,मस्ती आणि धमाल करत पुढे चालू राहील अशी आशा आहे आणि आपण एकमेकांकडून काही ना काही शिकत राहू ही इच्छा बाळगतो. माझ्याकडून काही शिकण्यासारखं काही असेल असं मला वाटत नाही पण तुमच्या “प्रत्या” ह्या हाकेला ओव देण्याचा मी नेहमीच प्रयत्न करेल.

विथ लव्ह,
प्रत्या

P.S. – आज कुसुमाग्रजांचा जन्मदिवस म्हणजेच जागतिक मराठी भाषा दिन. सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

pratikakkawar
Pratik Akkawar

I am occasionally a poet, blogger and an amateur writer, trying to put my thoughts into words and sometimes words into poems.

One comment

  1. I nominated you for versatile Blogger Award . You totally deserve it 🙂
    If you are interesting in accepting it, you can visit my blog for details (akritimattu.wordpress.com )
    🙂

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site is protected by reCAPTCHA and the Google Privacy Policy and Terms of Service apply.